रत्नागिरी : 'माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूममेटची, मी राहत असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका,' असा स्टेटस ठेवत रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून उडी मारून वकिलाने आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. ॲड. सौरभ सोहनी असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. ॲड. सौरभ सोहनी हे मूळचे राजापुरातील रहिवासी असून, ते रत्नागिरीत वकिली करीत होते. आपल्या मित्रासोबत ते भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो, असे सांगून ते खोलीमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट भाट्ये पूल गाठला. भाट्ये पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वकील आणि पोलिस त्यांच्या शोधात बाहेर पडले. मात्र, रात्रीची वेळ आणि त्यातच मुसळधार पाऊस यामुळे त्यांच्या शोधकार्यात अडचणी आल्या. मंगळवारी सकाळी ॲड. सौरभ सोहनी यांचा मृतदेह रत्नागिरी शहरातील खडपेवठार समुद्रकिनारी तरंगताना आढळला. याची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
'कोणतीही चौकशी करू नका', स्टेटस ठेवत रत्नागिरीतील वकिलाने संपवले जीवन
By अरुण आडिवरेकर | Published: July 23, 2024 4:17 PM