देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील मौजे मोर्डे (लाडवाडी) येथे आज, सोमवारी सकाळच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. लाड यांच्या घराच्या मागील बाजूस हा बिबट्या आढळला. मृत बिबट्या दोन वर्षे वयाचा असण्याचा अंदाज आहे. या मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करुन दहन करण्यात आला.तालुक्यातील मोर्डे लाडवाडीतील श्रीमती इंदिरा गंगाराम लाड या नेहमी प्रमाणे सकाळच्या सुमारास पाणी भरण्यासाठी विहिरीवर निघाल्या होत्या. यावेळी त्यांना राहत्या घराच्या मागील बाजूस बिबट्या जमिनीवर आडवा पडलेल्या स्थितीत दिसला. बिबट्या दिसताच त्या घाबरल्या. यानंतर ही माहिती सर्वत्र पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. दरम्यान पोलिस पाटील गुरव यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. देवरुखचे पशुधन विकास अधिकारी कांबळे यांनी हा बिबट्या भुकेमुळे मृत झाल्याचे शविच्छेदनात नमूद केले आहे.विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामाकरून सदर मृत बिबट्याचे दुपारी दहन करण्यात आले. यावेळी वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक राजाराम पाटील, राहुल गुंठे व सूरज तेली आदी अधिकारी उपस्थीत होते.बिबट्या मृत होण्याच्या प्रमाणात सद्या वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याभरापूर्वी एक पूर्ण वाढीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे मोर्डेत मृतावस्थेत आढळला बिबट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 5:38 PM