रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव येथील एकाने लाॅकडाऊनपूर्वी घेतलेल्या १ लाख कर्जाच्या रकमेवर दाेन लाख रुपये व्याज वाढून कर्जाची रक्कम ३ लाख ८० हजार इतकी झाल्याचे समाेर आले आहे. कर्जाची परतफेड करूनही वसुलीसाठी तगादा लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाेलिसांनी रविवारी रात्री चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, त्यातील एकाला अटक केली आहे.याप्रकरणी मंदार सुरेश सुर्वे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार मिऱ्या येथील नीलेश शिवाजी कीर याला अटक करण्यात आली आहे. तर, अरुण बेग, राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुवारबाव येथील मंदार सुरेश सुर्वे यांनी लॉकडाऊन पूर्वी २००१ साली नीलेशकडून ३० हजार रुपये दहा आठवड्यांच्या मुदतीसाठी घेतले होते. ३० हजारांच्या बदल्यात त्यांनी १ लाख ४ हजार रुपये नीलेश कीरला दिले. त्यांनी अधिक व्याजदराने २ लाख २४ हजार ६०० रुपयांची परतफेड केली हाेती. मात्र, तरीही मंदार सुर्वे यांच्या मागे पैशासाठी तगादा लावत होता. यापूर्वी त्याने कोरे धनादेश मंदार सुर्वे यांच्याकडून घेतले होते, तर अधिकचे पैसे दे असे सांगत ठार मारण्याची धमकी दिली हाेती. या प्रकरणात आपली तब्बल ३ लाख ८० हजार रुपये इतकी फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी सावकारी रोखण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईनंतर मंदार सुर्वे यांनीही शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नीलेश कीरसह चाैघांविराेधात भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०,३८४, ३८५,५०४,५०६, ४०६,३४ व सावकारी अधिनियम ४४, ४५ नुसार गुन्हा दाखल करून नीलेश कीर याला अटक केली आहे. रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बहिणीला अडकवण्याची धमकीया सावकारी प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य तिघांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. व्याजी दिलेल्या रकमेवर दुप्पट तिप्पट पैसे घेऊनही वारंवार पैशाची मागणी करत बहिणीला अडकवण्याची धमकी नीलेशने दिल्याचेही पुढे आले आहे. नीलेशने व्याजी रकमेच्या बदल्यात कोणाकोणाच्या गाड्या ताब्यात ठेवल्या आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.