चिपळूण : बेलापूर येथे बैठक घेऊन कोकण रेल्वेच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांना दिले. मुकादम यांनी सोमवारी रत्नागिरी येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या मदतीने मुकादम यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. यावेळी वालोपे गावचे सरपंच विलास गमरे, कळंबस्ते गावचे उपसरपंच विवेक महाडिक, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कुलकर्णी यावेळी त्यांच्याबरोबर होते.मुकादम यांनी कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वेकडून कोकणातील प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत, किती रेल्वे या मार्गावर वाढविल्या पाहिजेत, याबाबत सविस्तर चर्चा केली. कोकण रेल्वेचा प्रकल्प होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या; परंतु रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांना योग्य तो न्याय दिला गेला नाही. या रेल्वेचा स्थानिक लोकांना उपयोग होत नाही, अशी खंत मुकादम यांनी दानवे यांच्यासमोर मांडली.कोकणसाठी आवश्यक असणारी चिपळूण-दादर पॅसेंजर रेल्वे सुरू करावी व कळंबस्ते येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्या त्यांनी दानवे यांच्याकडे केल्या. या सर्व समस्यांवर बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे दानवे यांनी मान्य केले. मुकदम यांना विश्वासात घेऊन रेल्वेच्या संदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
konkan railway: काेकण रेल्वेबाबत लवकरच बैठक, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 5:44 PM