रत्नागिरी : उन्हामुळे गाडीची खिडकी उघडी ठेवल्याने डोक्यात दगड बसून रेल्वे प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना तिरुन्नलवेली - जामनगर एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी (३० मे) सकाळी ९:३० वाजता निवसर (ता. रत्नागिरी) रेल्वे स्टेशन दरम्यान घडली. रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयाच्या पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अब्दुल मज्जीद अबूबक्कर काडबेन (५५, रा. सध्या माहीम- मुंबई मूळ रा. केरळ) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. अब्बूल मज्जीद काडबेन हे मुंबईमध्ये माहिम येथे काम करतात. मंगळवारी ते तिरुन्नवेल्ली जामनगर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या मागे साधारण निवसर रेल्वे स्टेशनच्या आसपास डोंगरातून दगड खाली आला आणि चक्क खिडकीतून त्यांच्या डोक्याला लागला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. बोगीमधील इतर प्रवाशांनी त्यांना डोक्याला पट्टी बांधून रत्नागिरी रेल्वे स्टेशनपर्यंत आणले.रेल्वे पोलिसांनी तात्काळ दखल घेत बोगीत येऊन अब्दुल मज्जीद काडबेन यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांच्या डोक्याला पाच-सहा टाके पडले आहेत. आता त्यांची तब्बेत स्थिर आहे. प्रवासात उन्हाळ्यामुळे रेल्वेची खिडकी उघडी ठेवल्याने हा प्रकार घडला.रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गावर डोंगराळ भागात काही ठिकाणी जाळ्या लावल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी अजूनही जाळ्या बसवण्यात आलेल्या नसून रेल्वेच्या जाण्या-येण्याच्या हादऱ्याने दगड खाली येत अशा दुर्घटना घडत आहेत.
उन्हामुळे वाऱ्यासाठी खिडकी ठेवली उघडी, डोक्याला दगड लागून रेल्वे प्रवाशी झाला गंभीर जखमी
By अरुण आडिवरेकर | Published: May 31, 2023 2:25 PM