लांजा : तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित नवल शेवाळे यांच्या बागेत शेकरू हा अत्यंत दुर्मीळ प्राणी आढळला आहे. या शेकरूचे झाडांवर बागडतानाचे दृश्य नवल शेवाळे यांनी टिपले आहे. लांजा तालुक्यात शेकरू आढळणे, ही गाेष्ट सुखद आणि दिलासा देणारी असल्याचे लांजाचे वनपाल दिलीप आरेकर यांनी सांगितले.नवल शेवाळे मूळचे भांबेड येथील असून, ते मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. त्यांनी भांबेड येथे काजू आणि आंब्याची बाग जोपासली आहे. दोन दिवसांपूर्वी ते गावी आले आहेत. बागेत गेल्यानंतर त्यांना एक वेगळा प्राणी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसला. लांबून माकडासारख्या दिसणाऱ्या या प्राण्याविषयी त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले. तसेच त्यांचे बागडतानाचे चित्रीकरणही केले.त्यानंतर नवल शेवाळे यांनी ते चित्रीकरण गावातील श्रीकृष्ण हेगिष्ट्ये यांना दाखविले. त्यांनी वनाधिकारी यांना हे दाखवून प्राण्याची खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी लांजाचे वनपाल दिलीप आरेकर यांना हे चित्रीकरण दाखविले असता त्यांनी हा शेकरू नावाचा प्राणी असल्याचे सांगितले. हा प्राणी दुर्मीळ असून, ताे लांजासारख्या भागात सापडल्याने ही बाब सुखद आणि दिलासादायक असल्याचे सांगितले.
राज्य पशूशेकरू हा प्राणी हा खारीची एक प्रजाती आहे. त्याला ‘उडती खार’ही म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव ‘रॅटुफा इंडिका’ असे आहे. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशू आहे. हा प्राणी भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळताे. रानआंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर या झाडांवर त्याला राहायला आवडते. याच झाडांवरील फळांचे अन्न म्हणून ताे उपयोग करताे.
दिवसाच सक्रियशेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्षे आहे. शेकरूची मादी तीन वर्षांत व नर पाच वर्षांत वयात येतो. शेकरू एकावेळेला १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो. सुर्योदय झाला की शेकरू घराबाहेर पडते, ठरलेल्या झाडावर अन्न खाते. सकाळी ११ ते ३ आराम करते. पुन्हा सूर्यास्तापर्यंत खाद्य खाऊन अंधारापूर्वी घरट्यात परततो.