शोभना कांबळेरत्नागिरी : तालुक्यातील उक्षी गावातील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या सुधीर घाणेकर या धडपड्या तरुणाचा ‘ऑस्करची गोष्ट’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीत झळकला आहे. केवळ स्मार्टफोनवर करण्यात आलेले या लघुपटाचे पूर्ण चित्रीकरण हे उक्षी गावातच स्थानिक कलाकारांना घेऊनच झाले आहे. प्रेक्षकांनी अंतिम फेरीत निवड केलेल्या २४ लघुपटांमध्ये ‘ऑस्करची गोष्ट’ हा सामाजिक संदेश देणारा लघुपट सातव्या क्रमांकावर आहे.सुधीरने उक्षीसारख्या खेडेगावात राहून शिक्षण घेतले. कोकणातील नमन, जाखडी या पारंपरिक कला जतन करायला हव्यात, या ध्यासाने झपाटलेल्या सुधीरने आपल्याच गावातील तरुणांना आणि लहान मुलांना या लघुपटात संधी देत लघुपटाचा लेखक, दिग्दर्शक म्हणून या लघुपटावर मोहोर उमटवली आहे. कोणत्याही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये न जाता, आपल्या अनुभव आणि जिद्दीच्या जोरावर हा लघुपट तयार केला आणि त्याच जोरावर संपूर्ण पोस्ट प्रॉडक्शन, पोस्टर डिझाइन अशी जबाबदारीही लीलया पेलली.सुधीरने हिंदी सिनेमात काम केले. अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिका, जाहिराती, विविध देशी आणि परदेशी माहितीपट यात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि आता आपल्याच गावात त्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा लघुपट तयार केला आहे. ५ जुलैपासून २ आठवडे हा फेस्टिव्हल जगभरात ऑनलाइन प्रदर्शित झाला.प्राथमिक फेरीत देश-विदेशातून १०८ विविध प्रकारच्या फिल्म्स आल्या होत्या. पहिल्या फेरीतच ‘ऑस्करची गोष्ट’ने १७ व्या स्थानावर बाजी मारली. अंतिम फेरीत जगभरातील प्रेक्षकांनी २४ लघुपटांना पसंती दिली. त्यात ‘ऑस्करची गोष्ट’ ७ व्या क्रमांकावर आहे.पुढील आठवड्यात युकेतील परीक्षक या २४ मधून एकूण ५ लघुपटांची निवड केली जाणार आहे. सुधीरला आता याच निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
संघर्षासह संदेशहीहा लघुपट शेतकरी विश्राम आणि त्याचा मुलगा संजय यांची ही गोष्ट आहे. वडिलांचा संघर्ष, मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठीची धडपड, लहान मुलांची कल्पनाशक्ती व निसर्गाकडे पाहण्याचा अथांगसारखा दृष्टिकोन, हे यातून दाखविण्यात आले आहे. यात पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, जीवन जगवा, अवयवदान व शिक्षणाचे महत्त्व आदी संदेश दिला आहे.
या फेस्टिव्हलमध्ये सादर झालेल्या १०८ उत्कृष्ट कलाकृती पाहता आल्या. ‘ऑस्करची गोष्ट’ची आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात अंतिम फेरीत निवड झाल्याने माझ्या संपूर्ण टीमला काम करण्याची अधिक प्रेरणा मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फेस्टिव्हलमध्ये मला सहभागी होता आले, हा आनंद, अनुभव खूपच प्रेरणादायी आहे. - सुधीर घाणेकर, लेखक, दिग्दर्शक