रत्नागिरी : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेश दौऱ्यावर आहेत. मात्र दि. २० ऑक्टोबरपूर्वी त्यांच्यासमवेत रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करू. शेतकऱ्यांतर्फे वानर, माकडांचा त्रास होत असल्याची समस्या मांडून त्यावर तोडगा काढू. हा धोरणात्मक निर्णय असल्याने वनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ या, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी अविनाश काळे यांनी उपोषण स्थगित केले.वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे. या प्रश्नासाठी गेल्या वर्षीही अविनाश काळे यांनी एक दिवसिय उपोषण केले होते. रत्नागिरीतही बैठक घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली होती. यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. परंतु आता वनमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर पुढील भूमिका ठरवू. अन्यथा स्थगित उपोषण पुन्हा सुरू करू, असे काळे यांनी यावेळी जाहीर केले. गुरूवारी दिवसभरात पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. शुक्रवारीही सकाळपासून दोनशे शेतकरी जमले होते.उपोषणावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उदय बने, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, सहकारतज्ञ अॅड. दीपक पटवर्धन, सांगलीतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही भेट दिली होती.
'माकडांच्या त्रासाबाबत तोडगा काढणार, वनमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक'
By मेहरून नाकाडे | Published: October 06, 2023 3:16 PM