रत्नागिरी : रेल्वे प्रवासात प्रवाशांना लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मडगाव - गोवा येथून अटक केली आहे. या चोरीप्रकरणी रत्नागिरी व राजापूर पोलिस स्थानकात जून २०२३ मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. दिनेश कुमार ओमप्रकाश (२७, रा. छर्पिया, पोस्ट महुवार, रुर्धेली खुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून ३९,२०० रुपये किमतीचे ४ मोबाइल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत.रेल्वे प्रवासादरम्यान साहित्य चाेरीला गेल्याची फिर्याद १२ जून २०२३ रोजी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात नाेंदविण्यात आली हाेती. या चाेरीत १५,४९९ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तसेच राजापूर पोलिस स्थानकात ३० जून २०२३ राेजी गुन्हा नाेंदविला हाेता. त्यामध्ये २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरला हाेता. या चाेऱ्यांनंतर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या सर्व चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दिनेश कुमार ओमप्रकाश याला २४ सप्टेंबर राेजी मडगाव येथून अटक केली. त्याने रत्नागिरी व राजापूर येथील दाेन्ही चाेऱ्या आपण केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याकडून ४ मोबाइल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमोल गोरे, पाेलिस हवालदार विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे यांनी केली.
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्याला अट्टल चोरट्यास गोव्यातून अटक, रत्नागिरी पोलिसांची कारवाई
By अरुण आडिवरेकर | Published: September 25, 2023 4:27 PM