गणपतीपुळे : अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकवणे कठीण होत असल्याने नैराश्येतून एका शिक्षिकेने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड घडला आहे. सविता जयवंत पाटील (वय-४०) असे त्यांचे नाव असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत.मालगुंड येथील रहाटागर येथे विजय साळवी यांच्याकडे भाड्याने राहत असलेले पाटील दाम्पत्य शिक्षक आहेत. त्यांचे मुळगाव बेंद्री (ता. तासगाव, जि. सांगली) आहे. याबाबत जयवंत महादेव पाटील (४४) यांनी याबाबतची खबर दिली आहे. त्यांच्या पत्नी सविता पाटील या अकरावी व बारावीच्या वर्गांना शिकवतात. मात्र हे शिकवणे कठीण जात असल्यामुळे वैयक्तिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.मालगुंड रहाटागर शिंपी तलाव येथे शनिवार दिनांक ३ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास त्या तळ्याच्या पाण्यात तरंगताना दिसल्या. ग्रामस्थांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेले. वैद्यकीय अधिकारी मधुरा जाधव यांनी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगितले.याबाबत अधिक तपास जयगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस नाईक जयेश कीर, नीलेश गुरव करत आहेत.
शिकवणं कठीण झालं, शिक्षिकेने तळ्यात उडी घेत घेत जीवन संपवलं; रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By मनोज मुळ्ये | Published: February 03, 2024 4:36 PM