रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. हा अभ्यास प्रकल्प राज्य वनविभागाचा कांदळवन कक्ष आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मार्फत (डब्ल्यूआयआय) राबविण्यात आला आहे. सध्या या मादी कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्याचा निर्णय ‘मँग्रोव्ह फाउंडेशन’ने घेतला. याअंतर्गत पाच मादी कासवांना ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले.
मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाला डब्ल्यूआयआयचे शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनांतर्गत ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले. तिचे नाव ‘प्रथमा’ ठेवण्यात आले.दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ मादी कासवाला ‘सॅटेलाइट ट्रान्समीटर’ लावण्यात आले. तिचे नामकरण ‘सावनी’ असे करण्यात आले. रेवा आणि वनश्री यांना फेब्रुवारी महिन्यात गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडले गेले.
त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास केला जात असून गुहागर येथून सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडल्यानंतर रेवाने दक्षिणेकडे एका सरळ रेषेत प्रवास सुरू केला आहे. ती पुन्हा कधीच राज्याच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली नाही. गेल्या दोन महिन्यात ती कर्नाटकातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचली आणि आता तिथून अरबी महासागरात खोल समुद्राकडे जाऊ लागली आहे.
रेवा पोहोचली दीवलागेल्या महिनाभरापासून गुजरात राज्यातील खोल समुद्रात राहणारी प्रथमा ही पहिली ऑलिव्ह रिडले आता दीवच्या किनारपट्टीभागाच्या जवळ आढळून येत आहे. प्रथमाने उत्तरेकडील आगेकूच थांबवली असून आती ती दक्षिणेकडे परत येत असल्याचे नुकत्याच केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे. वनश्री आणि सावनी ही दोन कासवे सातत्याने दक्षिणेतील समुद्रातच वाटचाल करीत आहेत.