रत्नागिरी : मुलगा कॅन्सरने आजारी असल्याने आर्थिक मदतीची मागणी करणारी महिला मुले पळवणारी असल्याच्या गैरसमजातून तिला राजीवडा-कर्ला येथील महिला पालकांच्या जमावाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील मेस्त्री हायस्कूलमध्ये घडली. ही महिला मूळची परभणी येथील राहणारी असून, सध्या ती खेडशी (ता. रत्नागिरी) येथे राहत आहे.धुमाळ नामक महिलेचा मुलगा खेडशी येथे आजारी आहे. त्याच्या उपचारासाठी मदत मिळवण्याच्या अपेक्षेने ही महिला मेस्त्री हायस्कूलमध्ये सकाळी गेली होती. ती शाळेतील प्राथमिक वर्गाजवळ गेली असता, तेथे पालकांची सभा सुरू होती. तिला पाहून पालकांनी शिक्षकांकडे विचारणा केली. परंतु, शिक्षकही या सर्व प्रकाराने गोंधळून गेले होते.दरम्यान, पालकांचा ही महिला मुले पळवण्यासाठीच शाळेत आल्याचा गैरसमज झाला. काहींनी इतर पालकांना फोन करून बोलावून घेतले. काही वेळातच ५० ते १०० पालक जमा झाले. त्यातील महिलांनी त्या महिलेला मारहाण केली. अखेर शिक्षकांनी मध्यस्थी करत महिलेची पालकांपासून सुटका करून तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर खरा प्रकार समोर आला.अफवा आणि अफवाचगेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स-ॲप, फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांव्दारे शालेय मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचे व्हायरल झाले आहे. परंतु, जिल्ह्यात अशी कोणतीही टोळी सक्रिय व झाल्याबाबतची तक्रार अथवा खात्रीशीर माहिती नसल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. पालकांनी व्हायरल गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी: मुले पळविणारी समजून महिलेला केली मारहाण, पोलिसांनी नागरिकांना केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 2:13 PM