देवरुख (जि. रत्नागिरी) : सोने-चांदीचे दागिने, दोन मोबाइल चोरण्याच्या उद्देशाने प्रेयसीला भातगाव पुलावरून पाण्यात ढकलून देत तिची दुचाकी घेऊन पळालेल्या आरोपीच्या संगमेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नितीन गणपत जोशी (वय २७, मूळ रा. पाचेरीसडा, ता. गुहागर, सध्या रा. नालासोपारा, ता. वसई, जि. पालघर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही घटना २२ ऑक्टाेबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन जोशी याने मूळ गावी आपले काम असून, त्या ठिकाणी जायचे आहे, असे प्रेयसीला सांगितले. ती तरुणी आपल्याकडील सोने-चांदीचे दागिने, दोन मोबाइल व तिच्या भावाने तिच्याकडे ठेवलेली दुचाकी घेऊन नितीनबरोबर नालासोपारा येथून २१ ऑक्टोबरला रात्री ट्रॅव्हल्सने निघाले. ते दि. २२ रोजी गुहागर परिसरात आले. तेथे नितीनने तरुणीची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि तो त्याच्या घरी निघून गेला.सायंकाळच्या सुमारास भातगाव पुलावर मित्र भेटायला येणार आहे. त्याला भेटून नालासोपारा येथे परत जाऊ, असे नितीनने प्रेयसीला सांगितले. नितीन तरुणीला दुचाकीने भातगाव पुलावर घेऊन गेला. रात्री आठच्या सुमारास नितीनने तरुणीला भातगाव पुलाच्या कठड्यावरून पाण्यात फेकले. त्यानंतर सोने, चांदीचे दागिने असलेली पर्स, मोबाइल व दुचाकी घेऊन पाेबारा केला. पुलाजवळ असणाऱ्या कामगारांनी प्रेयसीला वाचविले होते. प्रेयसीने नितीन जोशीविरुद्ध फिर्याद दिली होती. याप्रकरणी नितीन जोशी याला नालासोपारा येथे सापळा रचून ताब्यात घेतले.
प्रेयसीला पुलावरून ढकलून देत पसार झालेल्या तरुणाला अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 4:53 PM