रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यापासून माझ्या स्वप्नात एकजण येत आहे. मो माझ्याकडे मदत मागत आहे. तो कोठे आहे, ते जंगलातील ठिकाण असून, त्याच्या इमेज त्याने मला स्वप्नात दाखवल्या आहेत, असे म्हणत खेडमध्ये आलेला सिंधुदुर्गातील तरुण आठवडाभर खेडमध्ये होता. आपल्या या शोधकार्याचे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चालले आहे.आपल्या स्वप्नामध्ये येऊन एक तरुण आपल्याकडे मदत मागत आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव येथील एका तरुणाने खेड पोलिसांना दिली. त्याआधारे पोलिसांनी शोध घेतला असता खेड तालुक्यातील भोस्ते गावातील जंगलात एक मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला. तो मृतदेह पूर्ण सडला होता. एका तरुणाच्या स्वप्नांमुळे हे उघड झाल्याने याविषयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. तो मृतदेह कोणाचा आहे, इथपासून माहिती देणाऱ्या तरुणाभोवतीही गूढ वलय तयार झाले आहे. या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेल्या काही दिवसात अनेक व्हिडिओ टाकले आहेत.१६ ऑगस्टपासून माझ्या स्वप्नामध्ये एक तरुण येत आहे. त्याने रेनकोट घातला आहे. त्याच्या पायामध्ये काळे बूट आहेत. त्याच्याकडे एक बॅग आहे. तो कोण आहे, मला माहिती नाही. तो माझ्याकडे मदत मागतोय. त्याला मदत करण्यासाठी पाच दिवस मी खेडमध्ये फिरतोय. तो जसा गाईड करतोय, तसातसा मी फिरतोय. पण अजून हाती काहीच लागलेले नाही, असे या तरुणाने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
आपल्या स्वप्नात येणाऱ्या तरुणाने आपल्याला एका कंपनीचे नावही सांगितले. त्यानुसार मी कंपनीत जाऊन आलो. मात्र रविवार असल्याने कंपनी बंद होती, असेही त्याने एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
नेमका प्रकार काय?मुंबई गोवा महामार्ग, खेड बसस्थानक, खेड रेल्वे स्थानक, भोस्ते घाट अशा वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओ या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तो आपल्या ठिकाणाची, आपण काय करत आहोत, याची माहिती देत आहे. त्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे, तो इतकी माहिती व्हिडिओमधून का देत आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने गुंता वाढला आहे.
हा ‘गेम’चा भाग आहे का?गेल्या काही वर्षात भयंकर कृत्ये करायला लावणारे गेम इंटरनेटवर आले आहेत. हा तसाच काही ‘टास्क’ देण्याचा प्रकार आहे का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. पोलिस सर्वच दृष्टीने या प्रकरणाची माहिती घेत आहेत.
मृतदेह कोणाचा?पोलिसांना सापडलेली कवटी कोणाची आहे, तो मृतदेह कोणाचा होता याबाबतची माहितीही अजून पुढे आलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे.