रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराचा पाठलाग करुन कानशिलात लगावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. रमेश झोरे असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या कानाला गंभीर इजा झाली आहे. त्याने याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्याकडे तक्रार केली आहे.रमेश झोरे मंगळवारी दुग्ध व्यवसायासाठी रत्नागिरीत आला होता. त्यावेळी साळवी स्टॉप येथे वाहतूक पोलिसांकडून काही कारवाई सुरु होती. तेव्हा तिथून जाताना रमेश झोरे कारवाई करु नका, असे म्हणाला. त्याचा राग तिथे कारवाई करत असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आला.दुचाकीवरून पुढे गेलेल्या रमेश झोरेचा त्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. वाटेत रमेश झाेरे याला अडवून मारहाण केली. पाेलीस कर्मचाऱ्याने रमेशच्या कानशिलात मारल्याने त्यांच्या कानाच्या पडद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तो रुग्णालयात गेला असता त्याच्या कानाचा पडदा फाटल्याची माहिती वैद्यकीय अहवालात समोर आली आहे.कर्तव्य बजावत असताना पाेलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त हाेत आहे. दरम्यान, रमेश झाेरे याने याबाबत वाहतूक पाेलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्याकडे पाेलीस कर्मचाऱ्याविराेधात तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पाेलीस निरीक्षक सासने यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दुचाकीस्वार म्हणाला कारवाई करु नका, रागाने वाहतूक पोलिसाने लगावली कानशिलात; कानाला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 5:14 PM