चिपळूण : काॅलेज सुटल्यावर मैत्रिणीला साेडण्यासाठी जात असताना डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत श्रुती संताेष शिर्के (१८) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासाेबत असलेली मैत्रीण जान्हवी एकनाथ जाधव (१९) ही किरकाेळ जखमी झाली. हा अपघात बहादूरशेख नाका येथे मंगळवारी दुपारी १ वाजता घडला. या अपघातानंतर श्रुतीच्या नातेवाईकांनी पाेलीस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी डंपरचालक दिलीप गोविंद यादव (रा. डेरवण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रुती संतोष शिर्के ही मूळची भोम येथील रहिवासी होती. ती सध्या चिपळूण शहरात नवाभैरी मंदिर परिसरात राहत होती. मंगळवारी तिचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता. त्यासाठी ती डीबीजे कॉलेजमध्ये आली होती. कॉलेज सुटल्यानंतर तिची मैत्रीण जान्हवी एकनाथ जाधव हिला सोडण्यासाठी ती दुचाकी घेऊन बहादूरशेखच्या दिशेने जात होती. त्याचदरम्यान मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या एका ठेकेदार कंपनीच्या डंपरची जबर धडक त्यांच्या दुचाकीला बसली.ही धडक इतकी जबरदस्त होती की, दोघीजणी दुचाकीवरून खाली कोसळल्या. श्रुती ही थेट डंपरच्या मागील चाकाखाली सापडली, तर जान्हवी जाधव हिच्या हाताला दुखापत झाली. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार करून घरी सोडण्यात आले.
अपघातात श्रुती शिर्के हिचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी थेट चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेतली. शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, भाजप माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह अनेकजण पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मयत श्रुतीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत, सर्वप्रथम डंपर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली. तसेच मयताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली होती.
चिपळूण पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करून डंपरचालक दिलीप गोविंद यादव (रा. डेरवण) याच्यावर गुन्हा दाखल केला, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय भोसले हे अधिक तपास करत आहेत.
सायंकाळी चिपळूण पोलीस स्थानकात गर्दी होती. तसेच श्रुतीचे नातेवाईक व संबंधित ठेकेदार कंपनी प्रतिनिधी यांच्यात उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.