कुडाळ: महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्यासह निकटवर्तीयांच्या सुमारे ३३ प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्यानंतर अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे सांगितले जात आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या आहेत. यासंदर्भात आता युवासेना नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांच्या छापेमारी, कारवायांवर सडेतोड भाष्य केले आहे. अफवांवर किती बोलायचे आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचे यापुरते मर्यादित ठेवतो. आत्ताच्या काळात अफवा किती पसरवल्या जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. खूप गैरप्रकार सुरु आहे. यंत्रणा तर आहेत पण अफवांच्या बातम्या पाठवल्या जात असून त्यात मी जाणार नाही. अधिकृत गोष्टी समोर येतील. पण बदनामीच्या आणि अफवांच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे
यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, हे राजकीय षडयंत्र आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, तिथे या गोष्टी सुरु आहेत. न घाबरता या गोष्टीला सामोरे जावे लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. बंगाल, महाराष्ट्र जिथे जिथे यंत्रणा मागे लागत आहेत, तिथे तोंडावर पडत आहेत. राजकारण एके ठिकाणी पण जे घाणेरडे राजकारण सुरु आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. लोके सरकार बनवत असतात, पाडत असतात पण जे नैराश्य येते त्यातून हे सुडाचे राजकारण सुरु असून महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज
गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजप सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचे पाहिले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसेच हे विषय समोर आणले जात आहेत का हाही प्रश्न आहे. हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामे, विकास करत राहणे गरजेचे आहे, असे सांगत, तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल, जोर जबरदस्ती करत असेल तर मैत्री करणार का, असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानावर बोलताना, महाविकास आघाडीचा प्रयोग राजकीयदृष्ट्या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढलेले असतात तिथे ही खदखद होते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून या नाराजी दूर करतात. राजकारणात थोडे पुढे मागे हे चालत राहतं. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्त्वाचे आहे. सत्तेतून बाहेर पडण्यासंबंधी त्यांचे मत वैयक्तिक असेल. पण अर्थसंकल्पात आत्ताही आणि आधीही सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.