आबलोली :
गुहागर तालुक्यातील गजबजलेली आणि परिसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार, दि. १७ मे २०२१ ते २३ मे २०२१ या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटना, आबलोली यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १७ ते २३ मेदरम्यान कडक लाॅकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आबलोलीतील व्यापाऱ्यांनी फक्त औषधांची दुकाने वगळता बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
आबलोली बाजारपेठेत दवाखाना, बँक, पतसंस्था, पोस्ट, महावितरण, शाळा, महाविद्यालय आदी कामांसह बाजारहाट करण्यासाठी परिसरातील सुमारे २५ गावांतील लोकांची ये-जा असते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदींबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. तसेच दूध, फळे, भाजी यांची गरजूंना मागणीनुसार पुरवठादारांनी घरपोच सेवा द्यावी, असे ठरविण्यात आले. तसेच अनावश्यक खासगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, व्यापारी संघटना, पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १७ मे ते २३ मेपर्यंत बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे़ त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी बाजारपेठेत येऊ नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकार्य करावे.
-
सचिन बाईत,
अध्यक्ष- व्यापारी संघटना, आबलोली