चिपळूण : गृह अलगीकरण बंद केल्यानंतर आता प्रशासनाने गाव स्तरावरच विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये हे विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहेत. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
विलगीकरण कक्षासाठी स्वच्छ सार्वजनिक इमारत, शौचालयाची व्यवस्था उभारावी. यासाठी लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
विलगीकरण कक्ष उभारणीसाठी गावातील शाळा, अन्य इमारतीसह त्यात असलेल्या सुविधांची माहिती घेण्यासाठी मंगळवारी तलाठी, ग्रामसेवक व सरपंचांची अधिकाऱ्यांनी ऑनलाईन बैठक घेतली. त्यानुसार सर्व लेखी माहिती मागविण्यात आली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे संकट वाढले आहे. तालुक्यात सध्या ६४४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ४८१ जण घरातच उपचार घेत आहेत. मात्र, यातील अनेकजण १४ ते १७ दिवस वेगळे राहणे अपेक्षित असताना ५ ते ७ दिवसातच गावभर फिरत आहेत. कोरोना संसर्गात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे गृह अलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू केली जाणार आहेत.
तालुक्यातील १६७ गावांपैकी ३२ गावे या निकषात बसत असून, तेथे ही केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठीच ही बैठक घेण्यात आली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव आदींनी घेतलेल्या या बैठकीत गावातील शाळा, हायस्कूल, समाज मंदिरे यांची माहिती मागविण्यात आली असून, तेथे वीज, पाणी, शौचालये आदी भौतिक सुविधा आहेत का, याचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या दोन दिवसात त्याची लेखी माहिती संबंधित ग्रामपंचायतींकडून मागविण्यात आली आहे.
पन्नासजण कोराेनामुक्त
मंगळवारी ५० जण बरे झाले आहेत. सध्या तालुक्यातील ६४४ जणांवर कामथे, वहाळ, पेढांबे या शासकीय कोविड सेंटरसह खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत बळी गेलेल्यांची संख्या ३३० झाली आहे. तालुक्यातील एकूण ८ हजार ७७१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील ७ हजार ७९७ जण बरे झाले आहेत.