आवाशी : रत्नागिरीहून मुंबईकडे आंबा घेऊन जाणाऱ्या बाेलेराे पिकअप गाडीला लाेटे-घाणेखुंट येथील अंडरपास मार्गाजवळ अपघात झाला. यात दाेघे जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे ५.२० वाजता घडली. यात वाहनांचे व आंब्याचे नुकसान झाले आहे.
मुंबई-गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम इतरत्र वेगात सुरू असले तरी लाेटे-घाणेखुंट या मुख्य बाजारपेठ ठिकाणी हे काम गेली अनेक महिन्यांपासून धीम्या गतीने सुरू आहे. कितीतरी दिवसांपासून लाेटे-घाणेखुंट या ठिकाणी अंडरपाससाठी खाेदलेला खड्डा अद्यापही जैसे थे आहे.
रत्नागिरीहून रात्राै ३ वाजता कल्याण-डाेंबिवली येथे आंबा घेऊन जाणारी बाेलेरो पिकअप गाडी (एमएच ०८ डब्ल्यू ३१०६) ही लाेटेमाळ येथे सकाळी ५.२० वा. आली. अंडरपाससाठी खाेदून ठेवलेल्या खड्ड्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यात काेसळली. याच वेळी शेजारीच राहणारे रहिवासी गुलजार सुर्वे, त्यांचा मुलगा फैजान सुर्वे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. काळाेखात खड्ड्यात पडलेले वाहन त्यांना गाडीची वीज सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांनी खड्ड्यात उतरून गाडीचा चालक अक्षय चव्हाण (रा. डेरवण, सावर्डे) व वाहक उद्देश तारपी यांना मदत करून गाडीतून बाहेर काढले. सुदैवाने त्यांना किरकाेळ दुखापत झाली हाेती. सुर्वे कुटुंबीयांनी त्यांना शेजारील रुग्णालयात दाखल केले व गाडी मालक राजेंद्र भाटकर, रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. प्रसंगी मदत करून वाहनातील आंब्याची चाेरी हाेणार नाही यासाठी दक्षता घेणाऱ्या सुर्वे पितापुत्र व भगवान, सुर्वे, सपान खान, शाेएब खान यांना त्यांनी घटनास्थळी आल्यावर सहकार्याबद्दल आभार मानले. अपघातात बाेलेराे पिकअप व त्यातील आंबे असा सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची लाेटे पाेलिसांत नाेंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.