रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास खेड येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात कारचालक किशोर अनंत चव्हाण (वय-४८, रा. धामापूर, संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
महामार्ग पोलीस केंद्र असलेल्या कशेडी हद्दीमध्ये खवटी रेल्वे पुलाजवळ ही दुर्घटना घडली. रत्नागिरीवरून मुंबईकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या आयशर ट्रकला मागून धडकली. या अपघातामध्ये कारचालक किशोर चव्हाण यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले.
अपघातग्रस्त वाहनातील अन्य ७ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये सनम संदीप चव्हाण (वय १२ वर्ष), हर्षदा किशोर चव्हाण (वय ४० वर्ष), संतोष आबाजी चव्हाण (वय ५५ वर्ष), रितिका केशव चव्हाण (वय १६ वर्ष), सार्थक किशोर चव्हाण (वय १४ वर्ष), स्मिता संतोष चव्हाण (वय ५० वर्ष), स्नेहा सुरज कर्वे (वय २८ वर्ष) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात झाल्याचे कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.