रत्नागिरी : लोक अदालतीत फिर्यादी यांनी केलेल्या तडजोडीमुळे धनादेश न वठल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता झाली आहे.रत्नागिरीतील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात योगेंद्र श्रीपाद ढोले यांनी धनादेश न वठल्याप्रकरणी अनिल गोविंद ढोले यांच्याविरुद्ध २०१६ साली खटला दाखल केला होता. या खटल्यामध्ये गुणदोषावर सुनावणी होऊन, प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एन. सी. पवार यांनी आरोपी अनिल गोविंद ढोले याना परक्राम्य दस्तऐवज अधिनियमचे कलम १३८ प्रमाणे दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास आणि २,७४,७५०/- रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश केले होते. तसेच नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आणखी एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती.या खटल्याचा निकाल २२ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. मात्र, आरोपी अनिल ढोले यांनी सत्र न्यायालयात अपील करून शिक्षेला स्थगिती मिळवली होती. अपिलार्थी अनिल ढोले यांनी या अपिलात २,८४,००० एवढी रक्कम फिर्यादी योगेंद्र ढोले यांना देण्याचे मान्य केले व त्याप्रमाणे रक्कम अदा केली. त्यामुळे या लोक अदालतमध्ये फिर्यादी योगेंद्र ढोले यांनी तडजोड करून आरोपी नात्यातील असल्याने त्याच्या शिक्षेची मागणी मागे घेतली. त्यामुळे या प्रकरणी अनिल ढोले यांची शिक्षेशिवाय मुक्तता करण्यात आली आहे.रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश वर्ग १ चे अनिल आंबळकर यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलसमोर ही यशस्वी तडजोड घडवून आणली गेली. लोकअदालतच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना न्याय मिळाल्यामुळे दोन्ही पक्षकार समाधानी आहेत.
रत्नागिरीत शिक्षा झालेल्या आरोपीची तुरुंगवासाशिवाय मुक्तता
By शोभना कांबळे | Published: December 09, 2023 6:55 PM