टेंभ्ये/रत्नागिरी : नियम मोडणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाने शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ ते शनिवार दि. ६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २५ बसेसवर कारवाई करण्यात आली. यापैकी २ बसेस जप्त करण्यात आल्या आहेत.परिवहन आयुक्त डॉ. ढाकणे यांनी राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपासून सहायक मोटार वाहन निरीक्षकांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले होते. रत्नागिरीत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश मोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेमध्ये विनापरवाना अथवा परवाना अटीचा भंग करून टप्पा वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, प्रवासी बसमधून अवैध मालवाहतूक, वाहनामध्ये केलेले बेकायदेशीर फेरबदल, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट व वायपर इ. नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर न भरणे, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात आली.या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर वाहतुकीला चाप बसेल अशी अपेक्षा केली जात आहे. या मोहिमेमध्ये कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला.