आबलोली :
‘अत्यावश्यक सेवा’ वगळता बाकी खासगी वाहने, सर्वसामान्य जनता यांना संचारबंदी लागू असताना ही काही वाहनचालक, नागरिक किरकोळ कारण सांगून आबलोली बाजारपेठेत फिरत आहेत. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या ग्रामस्थांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सरपंच तुकाराम पागडे, पोलीस पाटील महेश भाटकर, पोलीस काॅन्स्टेबल प्रदीप भंडारी, तलाठी आनंद काजरोळकर, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी यांच्यासह ग्रामकृती दल सदस्यांनी याकामी पुढाकार घेतला होता.
गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठ ही परिसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती बाजारपेठ आहे. याठिकाणी वैद्यकीय सेवा, बँक, जीवनावश्यक वस्तू खरेदी आदी कामांसाठी ग्रामस्थ गर्दी करतात. मात्र, सध्या संचारबंदी असल्याने सर्व ‘अत्यावश्यक सेवा’ फक्त ७ ते ११ याच वेळेत सुरू असतात. त्यामुळे यावेळी बाजारपेठेत काही प्रमाणात वर्दळ वाढली हाेती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढे बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. वाहनचालक, नागरिक यांनी बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.