खेड : जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करता, दुकाने निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याप्रकरणी खेडमधील पाच व्यापाऱ्यांविराेधात खेड पाेलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार, ७ मे रोजी दुपारी ११ ते १२़.३० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली़.
कोरोना साथ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा गांभीर्याने प्रयत्न करत आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्व आपत्कालिन व्यवस्था जीवावर उदार होऊन काम करत आहेत. पोलीस यंत्रणाही शासनाने लागू केलेले नियम पाळले जात असल्याबाबत कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. परंतु, खेडमध्ये काही व्यावसायिक कोरोना साथीच्या प्रसाराला कारणीभूत ठरेल, असे वर्तन करत आहेत. शहरातील प्रकाश भवरलाल जैन, बळीराम साहेबराव जाधव, शरद धोंडू चव्हाण, धनंजय दत्ताराम पणदेरे, आदी व्यावसायिकांविरोधात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे आणि रोगप्रतिबंधक कायदा कलम १८९७मधील कलम २, ३चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.