दस्तुरी : खेड तालुक्यातील बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर येथील नगरपरिषदेने बुधवारपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे.
ग्रामीण भागातून बाजारपेठेत दैनंदिन कामकाजासाठी व बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक व नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी नगर प्रशासनाने विनामास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांवर बाजारपेठेत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, ही माेहीम काही दिवसांनी थंडावली हाेती. काेराेनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागताच नगर परिषद प्रशासनाने बुधवारपासून कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी पथकेही तैनात केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत फिरणारे सर्वाधिक नागरिक आढळले. संपूर्ण बाजारपेठेत ही मोहीम राबवून विनामास्क फिरणाऱ्यांना नगरपरिषदेच्या पथकाने चांगलाच दणका दिला आहे.