शिवाजी गोरेदापोली : दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टच्या बाजूला असणारे सी कोच रिसॉर्टवर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आज, मंगळवारी कारवाई केली. यावेळी याठिकाणी प्रतिकात्मक हातोडा घेवून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.मुरुड येथील साई रिसॉर्ट व सी कोच हे तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी सी आर झेडचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत दिल्लीत पर्यावरण विभागाकडे देखील तक्रार केली होती. यानुसार पर्यावरण विभागाने सदर रिसॉर्ट जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने सदर रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. यानुसार सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर निविदा यश कन्स्ट्रक्शन यांना प्राप्त झाली. यानुसार यश कन्स्ट्रक्शनचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सी कोच रिसॉर्टच्या ठिकाणी हातोडा मारला. यावेळी किरीट सोमय्या यांच्या हातात देखील प्रतिकात्मक हातोडा होता.यावेळी बोलताना सोमय्या यांनी, अनिल परब यांच्यावर टीकेची तोफ डागली. परब यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून साई रिसॉर्ट व सी कोच बांधले असल्याचा आरोप केला. शिवाय साई रिसॉर्ट देखील लवकरच जमीनदोस्त करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.
साई रिसॉर्टच्या शेजारील 'सी कोच' वर अखेर हातोडा, किरीट सोमय्या देखील प्रतिकात्मक हातोडा घेवून उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 7:33 PM