साखरपा : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २५ वाहनचालकांवर साखरपा पोलीस ठाण्यातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून सहा हजार रुपये तसेच विनामास्क फिरणाऱ्यांकडून २००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांनी धसका घेतला आहे.
संचारबंदी कडक
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी साऱ्यांनीच लाॅकडाऊनचे नियम पाळण्याचा निर्णय गावाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
उकाड्याने केले हैराण
रत्नागिरी : सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. घशाला कोरड कायम पडलेली आहे. एप्रिल महिन्यातील उष्म्या त्रासदायक होत असून, सध्या कोरोनामुळे शीतपेये पितानाही नागरिकांना भीती वाटत आहे.
फिरत्या विक्रेत्यांचे नुकसान
रत्नागिरी : सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, फळ तसेच रसविक्रेते यांनाही आता रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच ठप्प झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सेतू कार्यालय बंद
देवरूख : कोरोनाच्या कारणामुळे येथील सेतू कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, सेतू बंद राहिल्याने त्याचा फटका महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. सध्या या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज भासत आहे; मात्र सेतू कार्यालय बंद राहिल्याने हे दाखले मिळविताना अडचणी येत आहेत.
कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण
चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे आता विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. शासनाने ५० टक्के उपस्थितीचा आदेश काढला असला, तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही १०० टक्के कर्मचारी येत आहेत. त्यामुळ संसर्गाची भीती कायम आहे.
विजेचा खेळ कायम
लांजा : उकाड्याने त्रस्त होत असतानाच रात्री-अपरात्री विजेचा पुरवठा अनियमित झाला आहे. उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागले असतानाच रात्री बऱ्याचदा वीज जात असल्याने पंख्याशिवाय काही काळ रहावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
कनेक्टिव्हीटीची समस्या कायम
राजापूर : शहर तसेच ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टिव्हीटीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या सर्वच कामे ऑनलाईन सुरू आहेत, मात्र कनेक्टिव्हीटीमध्ये सतत येणाऱ्या व्यत्ययांमुळे अनेक अडचणी येत आहेत. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे.
उद्यानांमध्ये शुकशुकाट
रत्नागिरी : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी आणली आहे. त्यामुळे आता उद्याने बंद आहेत. बालके सध्या घरात बसून कंटाळली असली, तरी त्यांना उद्यानात जाता येत नाही. मुलांअभावी या उद्यानात सध्या शुकशुकाट पसरला आहे.
पाण्याची टंचाई
मंडणगड : तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील जनतेला सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भागांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये आता टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.