चिपळूण : शहरातील भाजी मंडईसमोर रस्त्यालगत अतिक्रमण करुन बसलेल्या १० ते १५ भाजी व्यावसायिकांवर बुधवारी नगर पालिका प्रशासनाने कारवाई करुन त्यांना हटविण्यात आले.वर्षभरापूर्वी अशाच प्रकारची नगर पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावर बसणाऱ्या भाजी व्यावसायिकांवर कारवाई केली होती. या कारवाईनंतर भाजी व्यावसायिक एकत्र आले होते. त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, यावेळी तसा कोणताही प्रकार झाला नाही. नगर पालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने भाजी व्यावसायिक व काही हातगाडीवाले यांना हटविले आहे.
ही कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम अभियंता परेश पवार, अनंत मोरे, संतोष शिंदे, अशोक चव्हाण, संदेश टोपरे, आरोग्य विभागाचे वैभव निवाते व इतर कर्मचारी सहभागी होऊन ही कारवाई केली.चिपळूण शहरामध्ये नगर पालिकेने महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई बांधली आहे. भाजी मंडई असूनही काही भाजी व्यावसायिक रस्त्यालगत ठाण मांडून भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. यापूर्वीही अशीच कारवाई नगर पालिकेने केली होती. आणखी काही ठिकाणी रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.चिपळूण नगर परिषदेने भाजी व्यापाऱ्यांसाठी मडई उभारली आहे. याठिकाणी भाजी व्यापाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, परस्परांमधील स्पर्धेमुळे काही भाजी व्यापारी चिपळूण शहरात ठिकठिकाणी ठाण मांडून विक्री करत असल्याचे दिसून आले होते. यामुळे चिपळुणात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चिपळूण पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.