शोभना कांबळेरत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेचा लाभ आयकर दाते तसेच निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी घेतल्याचे निदर्शनास आल्याने घेतलेला लाभ परत करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. अशा अपात्र ४०२० शेतकऱ्यांकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख ३२ हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली असून, सुमारे दीड कोटीची वसुली अजूनही बाकी आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन तीन टप्प्यांत दिली जात आहे. जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ५७ हजार ९९९ एवढे लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ केवळ अल्पभूधारक तसेच ज्यांचे उत्पन्न १० हजारांच्या आत आहे, अशांना देण्यात येतो.
असे असतानाही या योजनेचा लाभ आयकर भरणारे तसेच नवरा - बायको दोघेही नोकरीला असणाऱ्यांकडून घेण्यात आला होता. आधार कार्ड लिंक असल्याने शासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे अशा अपात्र शेतकऱ्यांवर कारवाई करून त्यांना देण्यात आलेली रक्कम परत करण्यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. देशभरातील अशा अपात्र शेतकऱ्यांची यादी आणि त्यांनी भरावयाच्या रकमेसह यादी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती.
त्यानुसार अशा अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात कारवाई सुरू झाली आहे. पोर्टलद्वारे ही पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वर्षभरात केवळ सव्वा काेटीची वसुली
- आयकर भरलेले तसेच अन्य कारणाने अपात्र शेतकऱ्यांकडून पेन्शन परत घेण्याची कारवाई
- जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी १५१० शेतकऱ्यांनी १ कोटी २० लाख ७२ हजार एवढा भरणा केला आहे.
- उर्वरित २५१० अपात्र शेतकऱ्यांकडून १ कोटी ५२ लाख ३२ हजार रुपयांचा भरणा व्हायचा असून, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे.
४९८ शेतकऱ्यांना लाभ नाही
- जिल्ह्यातील आयकर भरलेल्या ४०२० शेतकऱ्यांपैकी ३५२२ शेतकऱ्यांनी घेतला लाभ.
- ३५२२ शेतकऱ्यांना मिळाला पहिल्या हप्त्याचा लाभ
- ४९८ जणांना लाभ मिळाला नाही