रत्नागिरी : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरून अनावश्यक फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखा कारवाई करत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात 1732 वाहनांवर कारवाई करत 6 लाख 5 हजार 903 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 20 वाहने जप्त करण्यात आली आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात 3 जूनपासून 9 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. लॉकडाऊन मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कडक कारवाई करत आहेत. 3 जून रोजी 801 वाहनांवर कारवाई करत 2 लाख 87 हजार 700 रूपयांचा दंड वसूल केला. 9 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
4 जून रोजी 501 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 68 हजार 600 रुपये दंड वसूल केला. 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी 5 जून रोजी 430 वाहनांवर कारवाई करत 1 लाख 49 हजार रूपयांचा दंड वसूल केला असून सहा वाहने जप्त करण्यात आली आहेत.