रत्नागिरी : जिल्हाभर होणाऱ्या गौण खनिजाच्या अवैध उत्खननावर जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने चोरटी वाहतूक करणाऱ्यांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे. विखारेगोठणे (ता. राजापूर) येथील चिरेखाणींवर आढळून आलेल्या विनापरवाना वाढीव उत्खनन प्रकरणी तीन कोटींपेक्षा अधिक दंड आकारण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी राजापूर दौऱ्यात या भागातील सहा चिरेखाणींवर अचानक भेट देऊन कारवाईचा बडगा उगारला. विनापरवाना वाढीव उत्खनन केल्याप्रकरणी सहा चिरेखाण मालकांना कोटीच्या घरात दंड लावण्यात आला होता. यावर चिरेखाण मालकांना बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, राजापूरच्या तहसीलदारांकडून विनापरवाना वाढीव उत्खननाचा दंड कायम करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे चोरट्या पद्धतीने उत्खनन करणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. प्रतिब्रास दहा हजार रूपये असा दंड आकारतानाच छाप्यात जप्त केलेले गौण खनिजही हातचे गेल्याने अवैध उत्खनन करणाऱ्या व त्यांची वाहतूक करणाऱ्यांना हा चांगलाच फटका होता. त्यानंतर चिपळूण तालुक्यातही गोवळकोट, कालुस्ते, केतकी, चिवेली, कोंढ्ये, शिरळ आदी भागात चोरट्या पद्धतीने उत्खनन होत असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला. गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. चिपळुणात महसूल विभागाकडून सतत कारवाई होत असल्याने त्याचा धसका आता जिल्ह्यातील चोरट्या वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी घेतला आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आता जिल्हाभर ही मोहीम तीव्र करण्याचे आदेश सर्व तालुक्यांना दिले असल्याने आता कारवाईचा बडगा चांगलाच उगारला जात आहे. त्यामुळे आता चोरट्या पद्धतीने उत्खनन करणाऱ्या वाळू व्यावसायिकांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या जप्तीबरोबरच वारेमाप दंडाची रक्कम सक्तीने भरावी लागत असल्याने त्यापेक्षा परवाने घेणे योग्य असा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकांची परवाने घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी परवाने देऊन नियमानुसार गौण उत्खनन करण्यास मंजुरी दिली होती. मात्र, काही ठिकाणी गेले कित्येक महिने सुखेनैव अवैध उत्खनन चालू होते. त्यांना अधिकाऱ्यांचे अभय असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, आता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीच कारवाईचा बडगा उगारून दंड वसूल करण्यास सुरूवात केल्याने या कारवाईचा धसका वाळू व्यावसायिकांनी घेतला आहे. आतापर्यंत परवान्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळींची आता परवाने मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. या धडक मोहिमेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) नियमबाह्य कारवाईजिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तीन पट दंडाऐवजी पाच पट दंड आकारण्याची केलेली कारवाई नियमबाह्य असल्याचे मतव्यक्त होत आहे. महसूल यंत्रणा गरीब वाहतूकदारांवर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही काही व्यावसायिक करीत आहेत.‘लोकमत’च्या वृत्ताने जाग : जिल्हा प्रशासनाने घेतली दखलराजापूर तसेच चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिजांच्या अवैध उत्खननप्रकरणी ‘लोकमत’ने छायाचित्रांसह निर्भिडपणे प्रसिद्धी दिली होती. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन लागलीच कारवाईला प्रारंभ केला. या धडक कारवाईमुळे अनेक ठिकाणी अवैध वाढीव उत्खनन करणाऱ्या चिरेखाणींची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी स्वत: जाऊन पाहणी केली व दोषींवर कडक कारवाई केली. त्यापाठोपाठ चिपळूण येथेही मोहिमेचे अस्त्र उगारल्याने आता या वाळू व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कारवाईचा घेतला धसका
By admin | Published: March 16, 2016 8:25 AM