रत्नागिरी : पहिल्या कोरोना लाटेवेळी गृह अलगीकरणात असलेल्या व्यक्तींवर ग्राम कृती दलाचे लक्ष असायचे. त्याचप्रमाणे त्यांच्या घरावर शिक्के मारले जायचे. परंतु, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मात्र, कोरोना रुग्ण घरात आहेत, त्या घरावर सध्या कुठलीच खूण दिसून येत नाही, त्याचबरोबर आता नागरी अथवा ग्राम कृती दलांकडेही यादी नसल्याने गृह अलगीकरणात कोण कोण आहेत, त्यांची नावे लक्षात येत नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे नाहीत अशा व्यक्ती बाहेर बिनधास्त वावरत अधिक संसर्ग वाढवीत आहेत.
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जलद गतीने वाढू लागला. त्यामुळे शासकीय रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर ताण येऊ लागला. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत, अशांमुळे रुग्णालयांतील खाटा अडून राहिल्याने गंभीर रुग्णांना खाटा मिळताना अडचणी येऊ लागल्या. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने ज्यांना कोरोनाची साैम्य लक्षणे आहेत किंवा अजिबातच लक्षणे नाहीत, अशा रुग्णांनी घरात राहूनच डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता असे रुग्ण घरात राहून उपचार घेत आहेत.
मात्र, काही रुग्णांच्या घरी अलगीकरणासाठी आवश्यक ती स्वच्छतागृह, स्वतंत्र खोलीची सोय नसल्याने अशा रुग्णांमुळे घरातील अन्य व्यक्तीही बाधित होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांनाही खीळ बसत आहे.
पहिल्या लाटेवेळी कोरोना रुग्ण कुठल्या कुठल्या भागातले आहेत, त्याची माहिती त्यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीला अथवा ग्रामकृती दल किंवा नागरी कृती दलाला दिली जात नसल्याचे निदर्शनाला येत आहे. त्यामुळे आपल्या भागातील कोरोना रुग्ण बाहेर कुठे जातो, याची कल्पनाही या कृती दलांना नसते. त्यामुळे लक्षणे नसलेल्या काही व्यक्तींचा सर्वत्र मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळेही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्यसेतूही कार्यरत नाही
पहिल्या कोरोना लाटेत कोरोनाबाधितांना आरोग्य सेतू हे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, सध्या हे ॲप दुसऱ्या लाटेत कालबाह्य झाल्यासारखे झाले आहे.
अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर
शहरांमध्ये वन रूम किचनमध्येही काही साैम्य किंवा लक्षणे नसलेले रुग्ण राहत आहेत. अशांमुळे अन्य बाधित होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांच्या घरातील लोकांबरोबरच त्यांच्या लगतच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्यांपासूनही शेजारच्या फ्लॅटमध्ये रुग्ण असल्याचे लपविले जाते. कृती दलही यापासून अनभिज्ञ राहत असल्याने या दलाचे कुणी सदस्य किंवा आशा वर्करही फिरकत नाहीत. त्यामुळे अशा इमारतींमधील नागरिकांचे विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निर्जंतुकीकरणाकडेही दुर्लक्ष
घरांमध्ये किंवा काही अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या रुग्णांबाबत माहिती नसल्याचे सांगत कृती दल हात झटकत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. अशा ठिकाणी एकापाठोपाठ अनेक रुग्ण वाढले असून, मृतांची संख्याही वाढली आहे.
तिसरी लाट कशी थोपविणार?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आधीच रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने आरोग्य विभाग घायकुतीला आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेतला नाही तर पुढे अधिक गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. आणि पुन्हा आरोग्य विभागावर अधिक ताण येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत आताच योग्यरीत्या कडक पावले उचलायला हवीत.
सुभाष थरवळ, अध्यक्ष, रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ