रत्नागिरी : अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील भगवती बंदरापासून ९ वावात या नौका एलईडी लाईट लावून मासेमारी करीत होत्या. या कारवाईत मत्स्य विभागाने ८ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
एलईडी फिशिंगला बंदी असताना चाेरट्या पद्धतीने एलईडी फिशिंग सुरू आहे. त्या विरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापूर्वी एलईडी फिशिंग विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी आवाज उठविला होता. हर्णै परिसरात मच्छिमारांनी आंदोलन केले होते. एलईडी फिशिंग बंद व्हावी यासाठी आमदार योगेश कदम यांनीही आवाज उठविला. त्यानंतर अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्यांविरोधात मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही चाेरट्या पद्धतीने मासेमारी सुरूच आहे.
सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाची गस्तीनौका रात्रगस्तीसाठी समुद्रात गेली होती. यावेळी भगवती बंदरापासून ९ वावात दोन नौका बेकायदेशीररित्या एलईडी फिशिंग करीत होत्या. यावेळी गस्तीनौकेवरील पथकाने त्या दोन नौकांच्या दिशेने जाऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेली मासेमारी तत्काळ थांबविली. तसेच तंजीला मर्यम, सफिना वाहिद या दोन नौकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत मत्स्य विभागाने २८ एलईडी लाईट, ३ जनरेटर असे मिळून सुमारे ८ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. या दोन्ही नौका मिरकरवाडा बंदरामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.