लाेकमत न्यूज नेटवर्क
आबलोली : कोणत्याही कार्यकर्त्याने लोकप्रतिनिधींची बदनामी होईल, अशी चुकीची वृत्ते देऊन नयेत. अशा वृत्तांमुळे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य यांची बदनामी होत आहे. पक्ष संघटनेसाठी कुणीही काम करावे. पण, त्याचसोबत विद्यमान लोकप्रतिनिधींची बदनामी होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना शिवसैनिकांनी यावेळी केली
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे शाखाप्रमुख संदीप निमुणकर यांच्या निवासस्थानी शिवसेना जिल्हा परिषद पडवे गटाची आढावा बैठक जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषद पडवे गटातील उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक, सरपंच यांचे विभागप्रमुख नरेश निमुणकर व रवींद्र आंबेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर गावनिहाय विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक गावात विकासाची झालेली कामे पाहून सर्वांनी समाधान व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, गुहागर सभापती पूर्वी निमुणकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर यांचे आभार व्यक्त केले. तसेच अजून नवीन कामे सुचविण्यात आली.
विद्यमान उपतालुकाप्रमुख संजय बाईत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवीन नियुक्ती करावी का, असा विषय यावेळी चर्चिला आला. यावेळी उपस्थित असणाऱ्या शिवसैनिकांमधून शरद रघुनाथ साळवी - खोडदे, विजय वैद्य - आबलोली, राजेंद्र साळवी - खोडदे यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर या विषयावर चर्चा झाली असता या सभेला उपस्थित असणाऱ्या तिघांमधूनच एकाची नियुक्ती करावी, असा सभेचा ठराव घेऊन आमदार भास्कर जाधव व तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्याकडे देण्याचे ठरले. त्यानंतर गणपतीच्या दिवसात शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करून गणपती उत्सव साजरा करावा, असे जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी सांगितले. या बैठकीसाठी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप सुर्वे, युवा उपजिल्हाधिकारी सचिन जाधव, तालुका उप महिला आघाडी वनिता डिंगणकर, शाखाप्रमुख, महिला आघाडी, सर्व सरपंच व शिवसैनिक उपस्थित होते. विभागप्रमुख रवींद्र आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.