रत्नागिरी : गेल्या २४ तासात तब्बल १३२ नव्या कोरोना रुग्णाची नव्याने भर पडली असून दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या ५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ६८७ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या ११५७० इतकी झाली असून ३८० जणांचा मृत्यू झाला असून १०४१० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मार्चच्या प्रारंभापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गेल्या ५ दिवसांत जिल्ह्यात ४६३ रुग्ण वाढले आहेत. दिवसेंदिवस वाढू लागलेल्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. त्यामुळे कोविड रुग्णालयांबरोबरच, कोविड आरोग्य केंद्रे, कोविड केअर सेंटर यात वाढ करण्यात आली असून खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे.
सोमवारी जिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार एकाच दिवसात १३२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यात आरटीपीसीआर चाचणीत ११३ तर अँटिजेन चाचणीत १९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ३१, दापोली २९, खेड १५, चिपळूण २८, संगमेश्वर ९, लांजा १९ आणि राजापूर १ असे १३२ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून गुहागर आणि मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. तसेच दापोलीतील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा आणि रत्नागिरीतील ५३ वर्षीय स्त्री रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालये तसेच कोरोना केअर सेंटर आणि कोरोना आरोग्य केंद्रात एकूण ५९९ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी २९३ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.