रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९० नव्या रुग्णांची भर पडली असून मंगळवारी ३ रुग्णांचे आणि त्याआधीचे १३ अशा एकूण १६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ३७५ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले. आतापर्यंत झालेल्या ५ लाख ६१ हजार ८०९ कोरोना चाचण्यांपैकी ४ लाख ९१ हजार २८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत ७० हजार ५११ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत २०२० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ६५ हजार ८६८ रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी - अधिक होत आहे. मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार, आरटीपीसीआर चाचणीत पाॅझिटिव्ह आलेल्यांची संख्या १६४ असून रॅपिड अँटिजन चाचणीत १२६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ७० हजार ५११ इतकी झाली असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार ८६८ इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात २२०१ रुग्ण विविध कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत.
एकाच दिवसात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात खेड, गुहागर, चिपळूण तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याआधीच्या १३ मृत्यूंची नाेंदही मंगळवारी करण्यात आली. यात राजापूर १ आणि १२ रत्नागिरी तालुक्यातील रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०२० इतकी आहे. यात ५० व ५० पेक्षा अधिक वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या १६९२ असून सहव्याधी असलेल्या ७३८ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात २४ तासांत ३७१५ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ३५५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १६४ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच २७६९ चाचण्या रॅपिड अँटिजनच्या करण्यात आल्या. त्यापैकी १२६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या १६३७ इतकी आहे. तर लक्षणे असलेले रुग्ण ५६४ इतके आहेत.