रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १०६ कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. २६ जण बरे झाले आहेत. ३४६५ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ७६,२८६ इतकी असून २३५२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२,६६४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १०६९ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून शनिवारी आलेल्या अहवालानुसार, दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या १०६ इतकी असून यापैकी आरटीपीसीआरमध्ये ६३ आणि रॅपिड अँटिजन चाचणीत ४३ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. शनिवारी आणि त्याआधीचा एक असे दोन मृत्यू नोंदविण्यात आले असून हे दोन्हीही रुग्ण चिपळूण तालुक्यातील आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण २३५२ मृत्यूंमध्ये ५० आणि त्यावरील जास्त वयोगटातील रुग्ण १९७५, तर सहव्याधी असलेल्या ८२७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या १०६९ रुग्ण उपचार घेत आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ७९५ इतकी असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या २७४ इतकी आहे.
आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये ७६,२८६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असून तब्बल ६ लाख ६७ हजार ७१ जणांच्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या साडतीन ते ४ हजारांपर्यंतच चाचण्या केल्या जात आहेत. सध्या रुग्ण संख्या काहीशी कमी वाटत असली तरीही अधूनमधून कमी-जास्त होत आहे. अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने आगामी गणेशाेत्सवात सर्वच नागरिकांनी कोरोनाविषयक खबरदारी घेत नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.