चिपळूण : तालुक्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. ६९ हजारपैकी १० हजार रुपये ग्रामस्थांनी भरल्यानंतर पुरवठा सुरू झाला. तिवरेतील बाधित कुटुंबीयांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे ही समस्या मांडल्यानंतर प्रशासनाकडून हे बिल भरण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले आहे.
तिवरे धरण फुटल्याने २२ जणांचा बळी गेला होता. धरणाच्या पायथ्याशी वसलेल्या भेदवाडीतील कुटुंबांचे अलोरे येथील शासकीय जागेत पुनर्वसन केले जात आहे. तिथे घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. पुनर्वसनासाठी सुरुवातीला मॉडेल घर उभारण्यात आले होते. यामध्ये कोटा पद्धतीची लादी वापरण्यात आली होती. त्याऐवजी पार्टेक्स पद्धतीची लादी बसवण्याची मागणी पुनर्वसनग्रस्तांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांनी बांधकाम विभागाशी चर्चा करीत पार्टेक्स लादी बसविण्याची सूचना दिली आहे.
बाधित कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन कंटेनरमध्ये करण्यात आले होते. या कंटेनरमध्ये महावितरणने वीज पुरवठा केला होता. त्याचे वर्षभराचे बिल थकीत राहिले होते. ६९ हजारपैकी १० हजाराची रक्कम बाधित ग्रामस्थांनी भरली होती. उर्वरित रक्कम शासनाकडून भरण्याचे ठरविण्यात आले. याबाबतचा निर्णय दिशा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी धरणग्रस्त लोकांना दिली आहे.