खेड : शासनाची कोणतीही परवानगी न घेता भरणे नाका येथे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आमदार योगेश कदम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना करून सहा दिवस उलटले, तरी अद्याप याप्रकरणी कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही. इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना विविध नियम दाखवणारी शासकीय यंत्रणा त्या रुग्णालयावर एवढी मेहरबान का, अशी चर्चा सध्या खेड तालुक्यात सुरू आहे.
तालुक्यातील भरणे नाका येथे एसएमएस रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेले दोन कोरोना रुग्ण दगावल्यानंतर हा प्रकार माध्यमांच्या निर्दशनास आला. त्यानंतर माध्यमाच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार डॉ. शेळके व सोनोने यांनी रुग्णालयाला भेट दिली व पाहणी केली.
कोविड सेंटर म्हणून या रुग्णालयाकडे कोणतीही मान्यता नसल्याचे या पाहणीप्रसंगी स्पष्ट झाले. मात्र कोणत्याही प्रकारची गंभीर दखल न घेता सदर प्रकरण बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार कदम यांनी दि. १५ रोजी तातडीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे संपर्क साधून या गोष्टींची त्यांना माहिती दिली. संबंधित डॉक्टर, रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची सूचना त्यांनी केली. परंतु या गोष्टीला आता सहा दिवस उलटून गेले असले तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही.
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठीची काटेकोर नियमावली जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिली आहे. लॉकडाऊनसारख्या वेदनादायी परिस्थितीत लहानात लहान दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनाच जावे लागत आहे. शहरात रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन न केल्यास आर्थिक दंड आकारला जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहेत. अशी परिस्थिती असताना अवैध पद्धतीने कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्यांवर मात्र कोणतीच कारवाई होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अहवाल गेला, पुढे काय?
यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी राजन शेळके यांच्याशी चर्चा केली असता, आम्ही वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे. त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे याविषयी त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.