रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील करक येथील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या १००८ कोटी ९६ लाख रुपये किमतीच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अर्जुना मध्यम प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत(PMKSY) समाविष्ट असून, नियोजनानुसार प्रकल्पाची कामे मार्च २०२२ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
अर्जुना प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणेअंतर्गत मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबईअंतर्गत अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरीअंतर्गत कार्यकारी अभियंता (पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, रत्नागिरी) मार्फत प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत ११४५.५० मीटर लांबीचे व ७०.३५ मीटर उंचीचे मातीच्या धरणाचे काम २०११ -१२ मध्ये पूर्ण झाले असून, प्रकल्पात ७४.६७ दशलक्ष घनमीटर (१०० टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे.
या प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यामधील १२ गावांतील ४७३३ व लांजा तालुक्यामधील सहा गावांतील १४३८ हेक्टर क्षेत्र असे मिळून १८ गावांतील ६१७१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी जून २०२१ अखेर ४८३० क्षेत्र (मूळ क्षेत्र) निर्माण झाले आहे. प्रकल्पावर मार्च २०२१ अख्रेर एकूण ८४४ कोटी ९० कोटी इतका खर्च झाला आहे.
प्रकल्पांतर्गत ५७ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यापैकी १ ते १७ किलोमीटरपर्यंत खुलाचर कालव्याचे मातीकाम, बांधकामे अस्तरीकरणासह पूर्ण झाले आहे. उर्वरित लांबीतील कामे बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे (PDN) प्रगतिपथावर आहेत. सद्य:स्थितीत बंदिस्त नलिका प्रणालीची ४५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
तसेच ३८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यापैकी १ ते १६ किलोमीटरपर्यंत खुलाचर कालव्याचे मातीकाम, बांधकामे अस्तरीकरणासह पूर्ण झाली आहेत. कालव्याच्या उर्वरित लांबीतील कामे बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे (PDN) प्रगतिपथावर आहेत. सद्य:स्थितीत बंदिस्त नलिका प्रणालीची ५२ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे डाव्या कालव्यावरील ताम्हाणे शाखा कालव्याचे कामामधील बंदिस्त नलिका प्रणाली बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे (PDN) प्रगतिपथावर असून, ६३ टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.