रत्नागिरी : शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव असणाऱ्या जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दि. १५ एप्रिलपासून प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळविली जाणार आहे. जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये ८६४ जागा असून, ८११ जणांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
आरटीई प्रवेशासाठी पालकांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने सोडत काढली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. शिक्षण विभागाने ऑनलाईन सोडतीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन दिवसांनंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोणाला प्रवेश मिळणार, हे पाहण्यासाठी दि. १५ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पालकांनी केवळ मोबाईलच्या एसएमएसवर अवलंबून राहू नये.
प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना आरटीईच्या पोर्टलवर जाहीर केल्या जाणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोडतीद्वारे मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादीतील पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये, असेही सूचित करण्यात आले आहे.