सचिन मोहितेदेवरुख : शाळेत जाणाऱ्या मुलीला बसस्टॉपवर सोडायला गेलेल्या प्रौढावर अचानक रानडुकराने हल्ला केला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. ही घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील कुळे वाशी थांब्यावर घडली. सुहास गुरव असे या जखमी प्रौढाचे नाव आहे. त्यांची मुलगी संपदाही घाबरुन पडल्याने तिलाही किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी बाप-लेकीवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कुळे वाशी येथे राहणारी संपदा सुहास गुरव ही दादासाहेब सरफरे विद्यालय बुरुंबी-शिवणे येथे दहावीत शिकते. शाळेत जाण्यासाठी ती सोमवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांसमवेत बस थांब्यावर उभी होती. अचानक बाजूला असलेल्या जंगलातून आलेल्या डुकराने सुहास गुरव यांच्यावर झेप घेतली. यात तीदेखील घाबरुन पडली. तिला किरकोळ दुखापत झाली आहे. याची माहिती मिळताच अजय साबळे, प्रचित मोहिते व चांदे यांनी संपदा गुरव व सुहास गुरव या दोघांनाही तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. तसेच या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी वनविभागाला याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी यांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. सुहास गुरव यांच्या हातावर टाके घालण्यात आले.
Ratnagiri: रानडुकराच्या हल्ल्यात प्रौढ जखमी, देवरुखनजीकची घटना
By मनोज मुळ्ये | Published: October 23, 2023 11:58 AM