लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पतीच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही आणि महिलेने घर साेडले. पायाखाली येणारी वाट तुडवत ती चालत राहिली. चालत-चालत ही महिला सांगलीतील कडेगाव येथून थेट रत्नागिरीत पाेहाेचली. रस्त्याने फिरत असतानाच रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी या महिलेला पाहिले. सामाजिक बांधीलकी जाेपासणाऱ्या राजरत्न प्रतिष्ठानने या महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि तेथून बरी हाेऊन तब्बल १७ वर्षानंतर ही महिला आपल्या कुटुंबात परतली.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील टीआरपी येथे आरडाओरड करणारी महिला सचिन शिंदे यांनी पाहिली. तिच्याकडे चौकशी केली असता तिला काही आठवत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात आणून तिची काेराेना चाचणी केली. ही पॉझिटिव्ह आली, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून ती बरी झाल्यानंतर तिला प्रादेशिक मनोरुग्णालयात आणले. हळूहळू तिच्यात सुधारणा झाल्यानंतर तिच्याकडे संवाद साधण्यात आला.
या महिलेने सांगितले की, काही काळ ती रत्नागिरी तालुक्यातील जयगड व लांजा तालुक्यातील देवधे या ठिकाणी वास्तव्यास होती. मात्र, या महिलेला आपले नाव, गाव सांगता येत नव्हते. काही दिवसांनी या महिलेने सांगली-कडेगाव येथे आपले घर असल्याचे सांगितले. ही माहिती दिल्यानंतर सचिन शिंदे यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला माहिती दिली. पाेलीस स्थानकाचे अंमलदार लक्ष्मण कोकरे, महेश कुबडे, रूपेश भिसे व सांगली पोलीस स्थानकाचे अधिकारी जालिंधर जाधव यांनी या महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेतला. तिच्या नातेवाइकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्या महिलेची बहीण, भाचा व मुले रत्नागिरीत आली. त्यांची ओळख पटविल्यानंतर त्या महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. १७ वर्षानंतर आपली व्यक्ती मिळाल्याचा आनंद या कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिसत हाेता.
यावेळी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोद गडिकर, उपअधीक्षक डॉ. अमित लवेकर, मानसाेपचार तज्ज्ञ डॉ. संजय कलकुटगी, अश्विनी शिंदे व समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे व राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शिंदे, पोलीस अंमलदार लक्ष्मण कोकरे, महेश कुबडे, रूपेश भिसे व मनोरुग्णालयाचे कर्मचारी होते.
---------------------
आईला पाहताच दाटले अश्रू
सांगली-वडेगाव येथील या महिलेला दोन मुले व एक मुलगी आहे. नातेवाईक भेटताच या महिलेने आपल्या बहिणीला व मुलीला लगेच ओळखले. काही वेळानंतर तिने आपल्या मुलालाही ओळखले. मुलाला ओळखताच त्याने तिला मिठीच मारली. आपल्या आईला समाेर पाहताच या मुलांच्या डाेळ्यात आनंदाश्रू वाहत हाेते. आईच्या भेटीने आनंदलेल्या मुलांनी राजरत्न प्रतिष्ठान आणि पाेलिसांचे आभार मानले.