खेड : खेड तालुका शांतता समितीची सभा पोलीस उपअधीक्षक चिन्मय पंडित यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी खेड पोलीस स्थानकामध्ये झाली. या सभेत धवडे गावातील २७ वर्षांपूर्वीचा शिमगोत्सवातील वाद मिटवण्यात आल्याची घोषणा पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांनी केली. याबरोबरच तालुक्यातील चाटव गावचा शिमगोत्सव वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.यावेळी उपअधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पोलीसपाटील, तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, ग्रामपंचायतींचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सुरुवातीला तालुक्यातील शिमगोत्सवाचा आणि रूढीपरंपरांचा आढावा घेण्यात आला. त्या ठिकाणी धार्मिक परंपरा जतन करण्यावरून वाद आहेत. तेथील वाद गावातील सरपंच, पोलीसपाटील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांनी मिळून मिटवावेत, असे आवाहन करण्यात आले. प्रत्येक गावात पोलीस पोहोचू शकत नाहीत. गावातील काही हेकेखोरवृत्तीच्या लोकांमुळे वाद विकोपाला जातात, अशावेळी वाद त्याचवेळी मिटवण्याचा प्रयत्न करावा. रंगपंचमीच्या दिवशी रासायनिक रंग टाळावेत तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेत पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करून शिस्त बाळगायला हवी, असे यावेळी जांभळे यांनी सांगितले.गावातील वाळीत टाकण्याचे प्रकार त्वरित थांबविणे आवश्यक असून, हे वाद स्थानिक पातळीवर तातडीने मिटवावेत, असेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील चाटव येथील शिमगोत्सवातील वाद मिटवण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून, यातील कोंडिवली शिमगोत्सव न्यायालयात गेल्याने यावर यथावकाश तोडगा निघण्याच्या आशा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय धवडे गावातील २७ वर्षांचा हा वाद आता पूर्णपणे मिटल्याने यावर्षी गावात शिमगा आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. कित्येक वर्षांनी प्रथमच होम पेटणार असल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
२७ वर्षांनंतर धवडेत होम पेटणार
By admin | Published: March 16, 2016 10:35 PM