लांजा : वेळेत निधी उपलब्ध होण्यात झालेला विलंब, कोरोना संकटामुळे निधीची कमतरता, कोकण रेल्वेची परवानगी मिळविण्यासाठी आलेल्या अडचणी आदी समस्यांवर मात करून, अखेर वेरवली बेर्डेवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम साडेसहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांनंतर वेरवली येथील ३५० ते ४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
लांजा तालुक्यातील वेरवली येथील बेर्डेवाडी धरणाच्या कामाला सन १९७७ मध्ये सुरुवात झाली होती. वेरवली गावातील १,०८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली. मात्र, १९७७ला सुरुवात होऊनही आलेल्या विविध अडचणींमुळे हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. या धरण प्रकल्पाबाबत माहिती देताना, उपविभागीय अभियंता के.आर. पाडवी यांनी सांगितले की, प्रत्यक्ष सन १९७७च्या सुमाराला धरणाच्या कामाला सुरुवात झाली. या कामाला सुरुवात झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी आल्या. यामध्ये वेळेत निधी उपलब्ध न होणे, धरण प्रकल्पाजवळूनच कोकण रेल्वे जात असल्याने, कोकण रेल्वेची परवानगी मिळण्यात झालेला विलंब आणि या धरण प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमीन व झाडे, बागायतीचे मूल्यांकनासाठी येणारी अडचण आणि त्यानंतर गतवर्षीच्या वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे आलेले संकट, यामुळे या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम रखडले होते.
आता धरणाच्या डाव्या कालव्याचे काम सहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे वेरवली गावातील साडेतीनशे ते चारशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याबरोबरच बंदिस्त असलेल्या उजव्या कालव्याचे पाइप टाकण्याचे कामही साडेसहा किलाेमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. या कालव्याच्या कामांमुळे वेरवली येथील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी येणार असल्याने, आता येथील शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येणे शक्य होणार आहे.