मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -झरझर सुरीने माशांची खवले काढून त्याचे तुकडे करून देणे, कोळंबीची कवचे काढून सोडे काढणे, लेपा, म्हाकूळ साफ करून त्याचे तुकडे करून देणे, हे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या २५ ते ३० महिला मिरकरवाडा बंदरावर आहेत. अत्यंत तुटपुंजा मोबदला मिळवून देणारे हे काम आज अनेकांची रोजची जगण्याची समस्या सोडवत आहे.नऊ महिने सकाळी पाच तास, तर सायंकाळी पाच तास जेटीवर मासे साफ करण्याचे काम चालते. कुणी गरिबीमुळे, तर कुणी नवऱ्याच्या निधनानंतर घरची जबाबदारी खांद्यावर घेत मासे साफ करताना दिसत आहेत. मासे साफ करताना टोचणारे काटे, माशावर सुरी फिरविताना कापले जाणारे बोट परंतु वेदनेची तमा न बाळगता बर्फाच्या पाण्यात थोडावेळ बोट बुडवून मंडळी मासे कापण्यात व्यस्त असतात. समोरचा ग्राहक दुसरीकडे जाऊ नये, यासाठी झरझर मासे साफ करण्याची कला जणू या भगिनींनी आत्मसात केली आहे.मिरकरवाडा बंदरावर मासे घेण्यासाठी मध्यमवर्गीयांपासून श्रीमंत कुटुंबातील मंडळीही येतात. येथे सुरमई, पापलेट, सरंगा, कोळंबी, मोडोसा, लेपा, सौंदाळे, बांगडे, म्हाकुळ असो वा खेकडे नानाविध प्रकारचे ताजे मासे मिळतात. बहुतेक मंडळी मासे विकत घेतल्यानंतर ते बंदरावरील भगिनींकडून साफ करूनच घरी नेतात. बहुतांश नागरिक फ्लॅट किंवा बंगलो पध्दतीच्या घरात राहात असतात. मासे साफ केल्यानंतर टाकाऊ भागाची दुर्गंधी येते. ती टाळण्याकरिता बंदरावर मासे खरेदी करून तेथेच साफ करून घेतले जातात. मच्छी मार्केटपेक्षा येथे स्वस्त आणि ताजे मासे मिळत असल्याने बंदरावर खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही मंडळी आठवडाभरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे घेऊन जातात. तसेच हॉटेल किंवा खानावळ चालविणारे व्यावसायिकसुध्दा घाऊक स्वरूपात मासे खरेदी करतात. संबंधित मंडळी मासे साफ करून कापून नेत असल्याने या भगिनींना रोजगार उपलब्ध होतो. नारळी पौर्णिमेनंतर जूनपर्यंत या भगिनींना रोजगार उपलब्ध होतो. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने या महिलांपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहतो.एक किलो मासे साफ करण्यासाठी १० ते २० रूपये मिळतात. काही महिला आपल्या मुलींना बरोबर घेऊन हा व्यवसाय करताना दिसून येतात. बंदरावर ग्राहक जास्त असले की, या मंडळींच्या अर्थार्जनात वाढ होते. कधी कधी दिवसाला २५० ते ४५० रूपयेही मिळतात. काही भगिनी मासे साफ करण्यासाठी कंपनीत जातात. निर्यातीकरिता माशाचे डोके व पोटातील घाण काढून मांस वेगळे केले जाते किंवा कोळंबीचे कवच काढले जाते. गेदर, शिंगटे, सुरमई यांसारखे मासे खारविण्यासाठी उभे चिरले जातात. मासे चिरून पोटातील घाण बाजूला करून त्यामध्ये मीठ भरले जाते. या कामासाठी भगिनींना नगाला ३ ते ५ रूपये दिले जातात. बंदरावर जास्त मासे आले की, दुपारच्या वेळेत खारवणाचे मासे किंवा कंपनीत मासे साफ करण्याचे काम या महिला करतात. दिवसाचे १२ ते १४ तास या भगिनी राबतात. हिवाळ्यात बोचऱ्या थंडीतही त्या भगिनी कंपनीत बर्फातील मासे साफ करतात. एयरी छोटंसं वाटणारं हे काम अनेकांच्या घरातली चूल पेटवते, हे मात्र खरे.मासे कापण्यासाठी मिळणारा किलोचा दरखलाशी किंवा दुसऱ्याच्या बोटीवर रोजगार करणाऱ्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची आलेली जबाबदारी पेलत असताना येथील भगिनीना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा मिळतोय का?बंदरावर मासे कापून साफ करून देणाऱ्यांमध्ये ८० टक्के वैधव्यप्राप्त महिला आहेत, तर २० टक्के महिला मुलांच्या शिक्षणासाठी, नवऱ्याच्या रोजगाराबरोबर आपणही रोजगार करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. प्रतिक्रिया कौटुंबिक जबाबदारी पेलत असताना सुमारे १४ ते १५ वर्षांपासून मी मासे साफ करीत आहे. सकाळी पाच तास व सायंकाळी पाच तास मासे साफ करून काही पैसे मिळतात. बंदरामुळे आम्हाला रोजगार मिळाला आहे. गरिबी व शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अन्यत्र रोजगाराची संधी मिळणे मुश्किल होते. त्यामुळे मासे कापणे, आमच्यासाठी ‘रोजी-रोटी’ बनली आहे. बंदरावर माशांसाठी होणारी गर्दी आमच्यासाठी जणू दिवाळी असते. दोन पैसे मिळविण्यासाठी कापलेल्या बोटावर चिंधी गुंडाळून काम करण्यातही एक समाधान प्राप्त होते.- जरीना अन्वर हुनेरकरघरची गरिबी, त्यात नवऱ्याचे झालेले निधन, पदरात असलेली पाच मुले कौटुंबीक विवंचना असताना बंदरावर मासे कापण्याचा रोजगार मिळाला. ग्राहकांनी घेतलेले मासे साफ करून देत असल्याने मिळणाऱ्या पैशात कुटुंब चालवित आहे. मुले शिक्षण घेत आहेत. वाढता शैक्षणिक खर्च व महागाईशी लढा देण्याकरिता बंदरावरील रोजगार हातभार लावत आहे. रोजगाराची आस असल्यामुळेच हाताला बोचणारे काटे किंवा सुरीमुळे कापणाऱ्या हाताच्या वेदना नष्ट होतात शिवाय दोन पैसे मिळतात.- जुम्माबी अल्लाऊद्दीन वस्तानवऱ्याचे निधन झाल्यानंतर अचानक कुटुंबाची जबाबदारी आली. चार छोट्या मुलांना सांभाळण्यासाठी मासे साफ करण्यास प्रारंभ केला. गेली दहा ते बारा वर्षे मी हा व्यवसाय करीत आहे. माशांच्या किमतीपेक्षा कापण्यासाठी मिळणारी किंमत अल्प आहे. परंतु रोजगारासाठी वणवण करण्यापेक्षा सकाळी व सायंकाळी बंदरावर बसून मासे साफ करते. दररोजच्या पैशातून कुटुंब चालविण्यास हातभार लागत आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद असते, त्यावेळी मात्र प्रचंड कसरत करावी लागते.- फैमिदा गफार होडेकर, मिरकरवाडा.मासे कापून वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकत आहे. मुले लहान असून, शिक्षण घेत आहेत. वाढत्या महागाईमुळे कौटुंबीक प्रपंच चालविताना असंख्य अडचणी येतात. त्यामुळे गेली पाच सहा वर्षे मासे कापून रोजगार मिळवित आहे. शाळा सुटल्यानंतर माझी मुलगीसुध्दा याकामी मदत करते. आमचा दिवस बंदरावर सुरू होऊन मावळतोही बंदरावरच. त्यातूनच सवड मिळाली की, कंपनीत माशांचे मांस वेगळे करणे किंवा खारवणाचे मासे कापण्यासाठी जाते. माझ्या समवेत काही भगिनी आहेत. मुलाना चांगले शिक्षण देण्याची इच्छा असल्याने या कामात मी स्वत:ला व्यस्त ठेवले आहे.- मुमताज यशवंत कांबळे
मासे साफ करूनच त्यांचं पोट भरतं...!
By admin | Published: December 16, 2014 10:39 PM