रत्नागिरी : तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्याने ग्रामस्थांनी मतदान करण्यास संमती दर्शवली आहे.टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे, अशा आशयाचे पत्र ग्रामस्थांनी रत्नागिरीचेतहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडे दिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत तहसीलदार जाधव यांनी शनिवारी तक्रारदार, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व गटविकास अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली होती.
या बैठकीत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर या रस्त्याचे अंतर समजण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्याची मोजणी करून घ्यावी व त्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण २६ नंबरला आहे किंवा नाही, त्याची माहिती घ्यावी. हे अतिक्रमण २६ नंबरवर असेल तर ग्रामपंचायत कारवाई करेल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसेल तर कलम १४३ अन्वये तहसीलदार कारवाई करतील, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने ही कार्यवाही करण्यात येईल. तोपर्यंत ग्रामस्थांनी सध्या आहे त्या मार्गाचा वापर करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय मागे घेऊन २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन केले.
तहसीलदार जाधव यांनी ग्रामस्थांच्या पत्राची तातडीने दखल घेऊन त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच तहसीलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी मतदान करू ,असे आश्वासन तहसीलदार यांना या बैठकीमध्ये दिले.मतदान करून फोन करा!रत्नागिरीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ग्रामस्थांच्या मतदान न करण्याच्या निर्णयाची तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने दखल घेऊन तोडगा काढला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मला फोन करून सांगा, असेही तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सांगितले.