खेड : सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात एक महिना वीज नसल्याने हा परिसर अंधारात होता. याबाबत लोकमतने १३ जुलै २०१७ रोजी कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थ अजून अंधारात या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आली असून, या खोऱ्यात असलेल्या २१ गावातील ग्रामस्थांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.कांदाटी खोऱ्यातील ही एकवीस गावे कायम दुर्लक्षित असून, या गावांमध्ये १ जूनपासून विजेचा लंपडाव सुरू झाला होता. शिंदी वळवण येथील ग्रामस्थ सदानंद मोरे यांनी ही समस्या प्रसारमाध्यमांच्या कानी घातली. यानंतर यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच कांदाटी खोऱ्यातील महावितरणची यंत्रणा जागी झाली. महावितरणची सारी यंत्रणा या खोऱ्यात कामाला लागली होती.खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा कांदाटी खोऱ्याला जोडला असल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी खेड शहराशी संपर्क साधला. वाई येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रशांत चोरमले यांनी तत्काळ कांदाटी खोऱ्यातील तापोळा येथील कनिष्ठ अभियंता एस्. वाय्. झरे यांच्याशी चर्चा करून हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
रघुवीर घाटामुळे आम्हाला आमच्या व्यथा किमान मांडता येतात. अन्यथा चहु बाजूने पाणीच असलेल्या या खोऱ्या तील एकवीस गावातील ग्रामस्थांचा आवाज शासन दरबारी पोहोचणे मुश्किलच आहे.- सदानंद मोरे, ग्रामस्थ, शिंदी - वळवण