रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या नावाची अधिक चर्चा आहे, त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. मात्र रात्रीपर्यंत उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीकडून कोणता पक्ष लढणार, हेच अजून निश्चित नाही. २०१९ साली या जागेवर शिवसेनेचा खासदार निवडून आला असल्याने शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला आहे. शिवसेनेकडून एकमेव किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. मात्र येथे विद्यमान खासदार हे ठाकरे शिवसेनेचे आहेत, असा मुद्दा धरून भाजपने या जागेसाठी आपला आग्रह कायम ठेवला आहे. स्थानिक भाजपच्या या भूमिकेमुळे ही जागा काेणाला जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.गुरुवारी भाजप नेते नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळे राणे यांची उमेदवारी अंतिम झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. भाजपकडून राणे यांचे, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, गुरुवारी रात्रीच किरण सामंत यांनी मुंबईकडे प्रयाण केले. शुक्रवारी त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत फडणवीस यांची भेट घेतली.या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतरही हा मतदारसंघ भाजपकडे राहणार की शिवसेना लढवणार, हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीमधील हा संभ्रम अजून कायम आहे.
नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 11:43 AM